शनिवार, ११ मे, २०१९


तरंग...एकअप्रतिम कलाकृती

धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण
अनुभवलेल्या गोष्टींचे,  घटनांचे , दृश्यांचे ...असंच..काहीसं घडलं.  आणि माझ्या मनात तरंग उठले ....

ते काही  थांबेनात… पिच्छा सोडेनात...मनातून  जाईनात आणि याचा कुठेतरी धागा माझ्या शाळेशी,
माझ्या घराशी, माझ्या संस्कारांशी जोडले गेल्याचे मला जाणवले..  याला कारण झाले ते
“तरंग”  या लघुपटाचे.…

या लघुपटाचे वेगळेपण  म्हणाल तर सहज, साधी गोष्ट आहे  एका शाळेत घडणारी…

काळसे  धामापूर  कुडाळ, जवळील गाव… तिथे  असणारी एक साधी शाळा… अर्थात शाळेत  शिकणारे
विद्यार्थी सर्वसामान्य.. पण एक त्यांच्यातीलच विद्यार्थी असामान्य  म्हणजे दिव्यांग…
(हल्ली. अंध, अपंग यांना दिव्यांग म्हणून संबोधलं जातं ..)

लता  माळी … यातील एक नायिका

शाळेची - आदर्श शाळा  पुरस्कार स्पर्धेसाठी निवड झालेली असते.. आणि अर्थातच  शाळेचे
परीक्षण करायला प्रशासकीय अधिकारी  येणार असतात…
अशा वेळी नेहमी प्रमाणे सर्व मुलांना सूचना दिल्या जातात…

शाळेची साफसफाई, सांस्कृतिक कार्यक्रम  यात मुलांना सहभागी केले जाते..

पण लता चं काय करायचं ? तिचं अस्तित्व समोर  आणायचं ? का , लपवायचं? इतरांसारख्या ती
वह्या कशा पूर्ण करेल ? असे अनेक प्रश्न शिक्षकांना पडतात.

तिचा सादरीकरणात किंबहुना शालेय कार्यक्रमात कसा सहभाग करून घ्यायचा ?
का तिला शाळेला दांडी मारायला सांगायची  ?अशी चर्चा शिक्षकांमध्ये होते आणि
लता चा सहभाग ही  जबाबदारी शाळेतील एक चित्रकला शिक्षक  स्वीकारतात…

पुढे  लता च काय होते ?

लता चित्रकला शिक्षकांच्या मदतीने चित्र कशी काढते आणि  शाळेला कसा मान
मिळवून देते याचे नेमके सादरीकरण यात केले आहे. चित्रकलेच्या वहीच्या कागदावर
फुलपाखरांचं रंगीत चित्र काढून स्वतःच्या आयुष्यात रंग भरणारी  लता आणि तिला
शिकवणारे शिक्षक या लघुपटात छान रंगवले आहेत.

शाळेचे परीक्षक विस्मयचकित होतात तिच्या चित्राने… आणि नकळत उद्गारतात...
“ती कानाने  बघते, स्पर्शाने आकार काढते, बोलताना  भावना व्यक्त करते आणि
गंधाने तिला रंग दिसतात.. “ हे अदभूत आहे.  
खरंच ती दिव्यांग नाही ,
पण ती एक प्रेरणा आहे…

“तरंग”  हा लघुपट दादर माटुंगा कल्चरल सेन्टर मध्ये काल  पहिला...आणि
नकळत मला माझ्या शाळेची आठवण झाली. माझ्या शाळेतल्या माझ्या  अंध
मैत्रिणींची आठवण झाली. तरुणपणी मी लेखनिक  म्हणून काम केलेल्या माझ्या
एका अंध परीक्षार्थीची आठवण झाली. माझ्या घरी येणाऱ्या एका अंध  विद्यार्थ्याला
माझी आई पाठ्यपुस्तक वाचवून दाखवत असे त्याची आठवण झाली..
नकळत या लघुपटाने मला भूतकाळातल्या माझ्या चांगल्या आठवणींना
उजाळा दिला  आणि बरच काही…

एव्हाना  आपल्या लक्षात  आले असेल की  “तरंग”   हा   लघुपट  कशावर आधारित आहे तर
एका अंध विद्यार्थिनीवर..
पण हा   फक्त २० मिनिटांचा लघुपट अत्यतं वेगळ्या पद्धतीने, मांडणीने सादर करण्यात
या  लघुपटाचा कथाकार, लेखक दिग्दर्शक असा  सर्वेसर्वा  
डॉ. सुमित पाटील  यशस्वी झाला आहे…

विशेष म्हणजे  या लघुपटात एकूण २१ दिव्यांगांनी (नेत्रहीन) विविध प्रकारची कामे केली आहेत.
ह्या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी पराग सावंत या एका डोळ्याने अंध असलेल्या तरुणाने केली आहे.
तर याला संगीत  विविध प्रकारची ५० वाद्य वाजवणारी अंध कलाकार योगिता तांबे हिने दिले आहे.

लघुपटाच्या माध्यमातून  अत्यंत सोप्या पद्धतीने “कठीण काहीच नसतं पण आहे ते
स्वीकारायचं असतं  आणि आपल्यातील प्रेरणा जागवत, सुगंध अनुभवायचा असतो “
हे सांगताना नेत्रदानाचा मंत्र देखील हा लघुपट देऊन जातो.  हे इतकं सहज घडतं की  मला वाटत
यातच या लघुपटाच यश सामावलेलं आहे.

या  लघुपटाच्या निमित्ताने  मला या लघुपटाच्या लेखक- दिग्दर्शक-निर्माता असलेल्या
डॉ. सुमित पाटील यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. अत्यंत तरुण पण निगर्वी असं व्यक्तिमत्व
१२- १३ वर्षाच्या त्याच्या संशोधनातून  त्यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.
आपल्या छंदाचा  व आपल्या शिक्षणाचा उपयोग दिव्यांगांकरिता करणारा हा
तरुण कलाकार.

रचना संसद मध्ये BFA (Batchelor of Fine Arts) ही  पदवी घेतल्यानंतर त्यांनी
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विद्या वाचस्पती (Doctorate)
ही पदवी संपादन केली. आणि त्या साठी त्याचा विषय होता
दिव्यांग लोकांना चित्रकलेच्या माध्यमातून शिक्षण”.
मदुराई विद्यापीठाने त्यांना डिलीट  देऊन गौरवण्यात आले आहे.

डॉक्टरेट असले तरी ते नावामागे डॉक्टरेट लावत नाहीत.. हा त्यांचा साधेपणा.
गेली १२- १३ वर्षे नेत्रहीन मुलांना चित्रकला शिकवत आहे.
“तरंग”  या लघुपटासाठी त्यांची १२ -१३ वर्षाची तपस्या असली तरी चित्रपटाचे चित्रीकरण
त्यांनी त्या गावी ६ दिवसात पूर्ण केले आहे. व फक्त ९ दिवस त्या गावात ते राहिले.

विशेष  म्हणजे लता माळी चे काम करणारी मुलगी ही  स्वतः अंध असून तिचे खरे नाव
शबनम अन्सारी आहे.
आणि तिची ती खरी कलाकृती आपल्याला त्या लघुपटात पाहायला मिळते.
कमला मेहता अंध शाळेची ती विद्यार्थिनी आहे. सध्या ती ११ वी मध्ये शिकत आहे.

या लघुपटाबद्दल बोलताना डॉ. सुमित पाटील म्हणाले की  त्यांना ह्या गोष्टीतून सांगायचे आहे की
प्रत्येकात काही ना काही दडलेलं असतं . प्रत्येकात एक वेगळा गुण  असतो. तो एक सुगंध असतो…
तो दरवळत असतो. आपण तो घ्यायचा असतो. त्याचा आनंद अनुभवायचा असतो.

 “तरंग” या नावाबद्दल सांगताना ते म्हणतात “आपल्या मनात एक तरंग येतो.
 तो किनाऱ्याला भिडेपर्यंतचा जो मोठा प्रवास आहे तो होत असताना एक वेगळा बोध देऊन जातो.
“ पाण्यात दगड टाकल्यावर जसे तरंग उमटतात तसेच या लघुपटाबाबतीत आहे.
एक एक पाकळी उलगडत जाते - ते सर्व दाखवायचा प्रयत्न या लघुपटातून केला  आहे.

वर वर पाहता साधी सोपी पटकथा वाटतं असली तरी  अंध विद्यार्थ्यांना चित्रकला
कशी शिकवली जाते याचे एक शिक्षण या लघुपटात पाहायला मिळते…

सोप लिहिणं  आणि सहजगता असणं  खूप कठीण असतं ..

नेत्रदानाचा कुठलाही अभिनिवेश सुरवातीपासून या लघुपटात जाणवत नाही.
हा लघुपट मला आवडला , बघा आपल्याला आवडतोय का ?

हो, पण हा लघुपट कुठेही  उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या विभागात, गावात, संस्थांमध्ये दाखवायचा असेल
तर डॉ. सुमित पाटील यांच्याशी जरूर संपर्क साधा. त्यांचा मोबाईल क्रमांक  आहे..९१८१०८१९१७५९..

-सीमा कोल्हटकर , मुंबई.







रविवार, ५ मे, २०१९

चला स्वीकारू या

10:07 PM, 5/3/2019] kolhatkarseema: ती आली , तीने विचार मांडले, आणि रसिकांना जिंकले…

अमर हिंद मंडळाची व्याख्यानमाला दरवर्षी येते आणि लग्नसोहळा असावा अशा पद्धतीने ७ दिवस कसे संपतात ते समजतच नाही. या वर्षीची ७२ वी  व्याख्यानमाला विशेष लक्षात राहील. वयाच्या ५ व्या  वर्षांपासून मी व्याख्यानमाला ऐकत मोठी झाले. मला आठवत आहे तेंव्हा १० पैसे, २५ पैसे, एक रुपया अशी तिकिटे असायची. बैठकी साठी वेगळे तिकिट, खुर्च्यांसाठी वेगळे .. आणि तिकीट काढायला रांग लागत असे. त्या वेळचा काळ वेगळा होता. अनेकविध
चॅनेल्स नव्हती. किंबहुना १९७२ नंतर आपल्या देशात दूरदर्शन आले. त्यामुळे  वैचारिक आणि मनोरंजनाची साधने
फारशी नसल्यामुळे असेल कदाचित, त्या वेळी  व्याख्यानांना गर्दी होत असे. आजकाल अनेकविध चॅनेल्स, असंख्य मनोरंजनाची साधने त्यामुळे व्याख्यानांना येणारी गर्दी आता कमी होऊ लागली आहे.  तरी गर्दी पेक्षा दर्दी माणसे व्याख्यानाला येतात ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.
गेली ७२ वर्षे व्याख्यान विविध स्वरूपाची होत असली तरी ह्यावर्षी कार्यकारी समितीने काळाच्या बदलाप्रमाणे थोडे बदल करायचे ठरवले.  आणि त्यातलाच एक बदल म्हणजे ह्यावर्षी प्रथमच तरुण व्याख्यात्याला बोलवायचे ठरले.
व्याख्यानाला येणारे वक्ते हे प्रौढ असावेत म्हणजे ते प्रगल्भ असतात ह्या विचाराला जरासा छेद देत प्रथमच तरुण
वक्त्याला प्राधान्य दिले.  सात दिवसांपैकी एक व्याख्यान हे तरुणाईचे होते. 
आणि खरोखरच आजची तरुण पिढी अभ्यासू आहे, प्रगल्भ आहे आणि आत्मविश्वासू आहे हे त्या व्याख्यानाने
लक्षात आले. डॉ. सुखद चिमोटे ह्या मानसशास्त्रज्ञ असलेल्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर. 
ती आली, तिने विचार मांडले, आणि रसिकांना जिंकले - विचार करायला प्रवृत्त केले. 
कारण अर्थातच विषय होता मनाचा.. विचारांचा आणि भावनांचा.
अर्थात सर्वांचा जिव्हाळ्याचा…
आपले अध्यात्मिक वाग्ङ्मय , विनोबा भावे ह्यांची गीताई, रामदास स्वामींचे दासबोध ह्यातील असलेले मनाचे वर्णन, मनाची स्थिती ह्यासंबंधीचे विचार
 मानसशास्त्रात दुसऱ्या पद्धतीने  कसे  वर्णिले आहे हे अतिशय सुदंर, सोप्या भाषेत सांगताना
तिने रसिकांची मने जिंकली.

ह्या व्याख्यानाने  आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये नक्की वागायचं कसं ? हे शिकायला मिळालं.

दोन  पिढ्यांमधील अंतर आता १० - २० वर्षाचे राहिले नाही, त्यामुळे पिढ्यापिढ्यांमधील मतभेद टाळायचे असतील,
स्वतःचे त्रास कमी करायचे असतील..
आणि आनंदी राहायचे असेल तर “ स्वीकारायला शिका”  हा मंत्र त्यांनी दिला.

काही गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणात नसतात तेंव्हा स्वीकारायला  शिका तसेच मार्ग काढण्यासाठी आपल्या
मनाला प्रश्न विचारायला शिकले पाहिजे कारण मन म्हणजे आपले विचार .. आपण जसा विचार करतो तशा  आपल्या भावना येतात आणि आपले वर्तन त्याप्रमाणे होते हे उदाहरणांनी समजावून दिले.


फक्त सकारात्मक विचारपद्धती नाही तर मन स्थिर करायला शिकले पाहिजे.. असे केलं तर आनंदाची अनुभूती अनुभवाल  हे सांगितलं..

सर्व सगळे हेच सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…
फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी… तेंव्हा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण…

खरी मजा पुढे झाली… दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले…  की  ज्या व्याख्यानमालेचे मी आतुरतेने वाट पाहत असते त्या व्याख्यानमालेच्या आयोजनापासून ते ती संपेपर्यंतचा माझा  काळ  हा अतिशय आनंददायी असतो ,
हीच माझी वर्षभराची ऊर्जा असते.....   आणि म्हणून  काही गोष्टी मनासारख्या घडत नसल्या तरी त्या स्वीकारून
वसंत व्याख्यानमालेच्या व्याख्यानांमध्ये रमण्याचा आनंद हा अवर्णीय असतो माझ्यासाठी… हाच विचार मला माझ्या प्रत्येक गोष्टीत करायचा आहे  कारण मला आनंदी राहायचे आहे… आणि आता त्याचा मंत्र ह्यावेळच्या व्याख्यानमालेतून मला मिळाला आहे…

तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...