शनिवार, ११ मे, २०१९


तरंग...एकअप्रतिम कलाकृती

धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण
अनुभवलेल्या गोष्टींचे,  घटनांचे , दृश्यांचे ...असंच..काहीसं घडलं.  आणि माझ्या मनात तरंग उठले ....

ते काही  थांबेनात… पिच्छा सोडेनात...मनातून  जाईनात आणि याचा कुठेतरी धागा माझ्या शाळेशी,
माझ्या घराशी, माझ्या संस्कारांशी जोडले गेल्याचे मला जाणवले..  याला कारण झाले ते
“तरंग”  या लघुपटाचे.…

या लघुपटाचे वेगळेपण  म्हणाल तर सहज, साधी गोष्ट आहे  एका शाळेत घडणारी…

काळसे  धामापूर  कुडाळ, जवळील गाव… तिथे  असणारी एक साधी शाळा… अर्थात शाळेत  शिकणारे
विद्यार्थी सर्वसामान्य.. पण एक त्यांच्यातीलच विद्यार्थी असामान्य  म्हणजे दिव्यांग…
(हल्ली. अंध, अपंग यांना दिव्यांग म्हणून संबोधलं जातं ..)

लता  माळी … यातील एक नायिका

शाळेची - आदर्श शाळा  पुरस्कार स्पर्धेसाठी निवड झालेली असते.. आणि अर्थातच  शाळेचे
परीक्षण करायला प्रशासकीय अधिकारी  येणार असतात…
अशा वेळी नेहमी प्रमाणे सर्व मुलांना सूचना दिल्या जातात…

शाळेची साफसफाई, सांस्कृतिक कार्यक्रम  यात मुलांना सहभागी केले जाते..

पण लता चं काय करायचं ? तिचं अस्तित्व समोर  आणायचं ? का , लपवायचं? इतरांसारख्या ती
वह्या कशा पूर्ण करेल ? असे अनेक प्रश्न शिक्षकांना पडतात.

तिचा सादरीकरणात किंबहुना शालेय कार्यक्रमात कसा सहभाग करून घ्यायचा ?
का तिला शाळेला दांडी मारायला सांगायची  ?अशी चर्चा शिक्षकांमध्ये होते आणि
लता चा सहभाग ही  जबाबदारी शाळेतील एक चित्रकला शिक्षक  स्वीकारतात…

पुढे  लता च काय होते ?

लता चित्रकला शिक्षकांच्या मदतीने चित्र कशी काढते आणि  शाळेला कसा मान
मिळवून देते याचे नेमके सादरीकरण यात केले आहे. चित्रकलेच्या वहीच्या कागदावर
फुलपाखरांचं रंगीत चित्र काढून स्वतःच्या आयुष्यात रंग भरणारी  लता आणि तिला
शिकवणारे शिक्षक या लघुपटात छान रंगवले आहेत.

शाळेचे परीक्षक विस्मयचकित होतात तिच्या चित्राने… आणि नकळत उद्गारतात...
“ती कानाने  बघते, स्पर्शाने आकार काढते, बोलताना  भावना व्यक्त करते आणि
गंधाने तिला रंग दिसतात.. “ हे अदभूत आहे.  
खरंच ती दिव्यांग नाही ,
पण ती एक प्रेरणा आहे…

“तरंग”  हा लघुपट दादर माटुंगा कल्चरल सेन्टर मध्ये काल  पहिला...आणि
नकळत मला माझ्या शाळेची आठवण झाली. माझ्या शाळेतल्या माझ्या  अंध
मैत्रिणींची आठवण झाली. तरुणपणी मी लेखनिक  म्हणून काम केलेल्या माझ्या
एका अंध परीक्षार्थीची आठवण झाली. माझ्या घरी येणाऱ्या एका अंध  विद्यार्थ्याला
माझी आई पाठ्यपुस्तक वाचवून दाखवत असे त्याची आठवण झाली..
नकळत या लघुपटाने मला भूतकाळातल्या माझ्या चांगल्या आठवणींना
उजाळा दिला  आणि बरच काही…

एव्हाना  आपल्या लक्षात  आले असेल की  “तरंग”   हा   लघुपट  कशावर आधारित आहे तर
एका अंध विद्यार्थिनीवर..
पण हा   फक्त २० मिनिटांचा लघुपट अत्यतं वेगळ्या पद्धतीने, मांडणीने सादर करण्यात
या  लघुपटाचा कथाकार, लेखक दिग्दर्शक असा  सर्वेसर्वा  
डॉ. सुमित पाटील  यशस्वी झाला आहे…

विशेष म्हणजे  या लघुपटात एकूण २१ दिव्यांगांनी (नेत्रहीन) विविध प्रकारची कामे केली आहेत.
ह्या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी पराग सावंत या एका डोळ्याने अंध असलेल्या तरुणाने केली आहे.
तर याला संगीत  विविध प्रकारची ५० वाद्य वाजवणारी अंध कलाकार योगिता तांबे हिने दिले आहे.

लघुपटाच्या माध्यमातून  अत्यंत सोप्या पद्धतीने “कठीण काहीच नसतं पण आहे ते
स्वीकारायचं असतं  आणि आपल्यातील प्रेरणा जागवत, सुगंध अनुभवायचा असतो “
हे सांगताना नेत्रदानाचा मंत्र देखील हा लघुपट देऊन जातो.  हे इतकं सहज घडतं की  मला वाटत
यातच या लघुपटाच यश सामावलेलं आहे.

या  लघुपटाच्या निमित्ताने  मला या लघुपटाच्या लेखक- दिग्दर्शक-निर्माता असलेल्या
डॉ. सुमित पाटील यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. अत्यंत तरुण पण निगर्वी असं व्यक्तिमत्व
१२- १३ वर्षाच्या त्याच्या संशोधनातून  त्यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.
आपल्या छंदाचा  व आपल्या शिक्षणाचा उपयोग दिव्यांगांकरिता करणारा हा
तरुण कलाकार.

रचना संसद मध्ये BFA (Batchelor of Fine Arts) ही  पदवी घेतल्यानंतर त्यांनी
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विद्या वाचस्पती (Doctorate)
ही पदवी संपादन केली. आणि त्या साठी त्याचा विषय होता
दिव्यांग लोकांना चित्रकलेच्या माध्यमातून शिक्षण”.
मदुराई विद्यापीठाने त्यांना डिलीट  देऊन गौरवण्यात आले आहे.

डॉक्टरेट असले तरी ते नावामागे डॉक्टरेट लावत नाहीत.. हा त्यांचा साधेपणा.
गेली १२- १३ वर्षे नेत्रहीन मुलांना चित्रकला शिकवत आहे.
“तरंग”  या लघुपटासाठी त्यांची १२ -१३ वर्षाची तपस्या असली तरी चित्रपटाचे चित्रीकरण
त्यांनी त्या गावी ६ दिवसात पूर्ण केले आहे. व फक्त ९ दिवस त्या गावात ते राहिले.

विशेष  म्हणजे लता माळी चे काम करणारी मुलगी ही  स्वतः अंध असून तिचे खरे नाव
शबनम अन्सारी आहे.
आणि तिची ती खरी कलाकृती आपल्याला त्या लघुपटात पाहायला मिळते.
कमला मेहता अंध शाळेची ती विद्यार्थिनी आहे. सध्या ती ११ वी मध्ये शिकत आहे.

या लघुपटाबद्दल बोलताना डॉ. सुमित पाटील म्हणाले की  त्यांना ह्या गोष्टीतून सांगायचे आहे की
प्रत्येकात काही ना काही दडलेलं असतं . प्रत्येकात एक वेगळा गुण  असतो. तो एक सुगंध असतो…
तो दरवळत असतो. आपण तो घ्यायचा असतो. त्याचा आनंद अनुभवायचा असतो.

 “तरंग” या नावाबद्दल सांगताना ते म्हणतात “आपल्या मनात एक तरंग येतो.
 तो किनाऱ्याला भिडेपर्यंतचा जो मोठा प्रवास आहे तो होत असताना एक वेगळा बोध देऊन जातो.
“ पाण्यात दगड टाकल्यावर जसे तरंग उमटतात तसेच या लघुपटाबाबतीत आहे.
एक एक पाकळी उलगडत जाते - ते सर्व दाखवायचा प्रयत्न या लघुपटातून केला  आहे.

वर वर पाहता साधी सोपी पटकथा वाटतं असली तरी  अंध विद्यार्थ्यांना चित्रकला
कशी शिकवली जाते याचे एक शिक्षण या लघुपटात पाहायला मिळते…

सोप लिहिणं  आणि सहजगता असणं  खूप कठीण असतं ..

नेत्रदानाचा कुठलाही अभिनिवेश सुरवातीपासून या लघुपटात जाणवत नाही.
हा लघुपट मला आवडला , बघा आपल्याला आवडतोय का ?

हो, पण हा लघुपट कुठेही  उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या विभागात, गावात, संस्थांमध्ये दाखवायचा असेल
तर डॉ. सुमित पाटील यांच्याशी जरूर संपर्क साधा. त्यांचा मोबाईल क्रमांक  आहे..९१८१०८१९१७५९..

-सीमा कोल्हटकर , मुंबई.







रविवार, ५ मे, २०१९

चला स्वीकारू या

10:07 PM, 5/3/2019] kolhatkarseema: ती आली , तीने विचार मांडले, आणि रसिकांना जिंकले…

अमर हिंद मंडळाची व्याख्यानमाला दरवर्षी येते आणि लग्नसोहळा असावा अशा पद्धतीने ७ दिवस कसे संपतात ते समजतच नाही. या वर्षीची ७२ वी  व्याख्यानमाला विशेष लक्षात राहील. वयाच्या ५ व्या  वर्षांपासून मी व्याख्यानमाला ऐकत मोठी झाले. मला आठवत आहे तेंव्हा १० पैसे, २५ पैसे, एक रुपया अशी तिकिटे असायची. बैठकी साठी वेगळे तिकिट, खुर्च्यांसाठी वेगळे .. आणि तिकीट काढायला रांग लागत असे. त्या वेळचा काळ वेगळा होता. अनेकविध
चॅनेल्स नव्हती. किंबहुना १९७२ नंतर आपल्या देशात दूरदर्शन आले. त्यामुळे  वैचारिक आणि मनोरंजनाची साधने
फारशी नसल्यामुळे असेल कदाचित, त्या वेळी  व्याख्यानांना गर्दी होत असे. आजकाल अनेकविध चॅनेल्स, असंख्य मनोरंजनाची साधने त्यामुळे व्याख्यानांना येणारी गर्दी आता कमी होऊ लागली आहे.  तरी गर्दी पेक्षा दर्दी माणसे व्याख्यानाला येतात ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.
गेली ७२ वर्षे व्याख्यान विविध स्वरूपाची होत असली तरी ह्यावर्षी कार्यकारी समितीने काळाच्या बदलाप्रमाणे थोडे बदल करायचे ठरवले.  आणि त्यातलाच एक बदल म्हणजे ह्यावर्षी प्रथमच तरुण व्याख्यात्याला बोलवायचे ठरले.
व्याख्यानाला येणारे वक्ते हे प्रौढ असावेत म्हणजे ते प्रगल्भ असतात ह्या विचाराला जरासा छेद देत प्रथमच तरुण
वक्त्याला प्राधान्य दिले.  सात दिवसांपैकी एक व्याख्यान हे तरुणाईचे होते. 
आणि खरोखरच आजची तरुण पिढी अभ्यासू आहे, प्रगल्भ आहे आणि आत्मविश्वासू आहे हे त्या व्याख्यानाने
लक्षात आले. डॉ. सुखद चिमोटे ह्या मानसशास्त्रज्ञ असलेल्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर. 
ती आली, तिने विचार मांडले, आणि रसिकांना जिंकले - विचार करायला प्रवृत्त केले. 
कारण अर्थातच विषय होता मनाचा.. विचारांचा आणि भावनांचा.
अर्थात सर्वांचा जिव्हाळ्याचा…
आपले अध्यात्मिक वाग्ङ्मय , विनोबा भावे ह्यांची गीताई, रामदास स्वामींचे दासबोध ह्यातील असलेले मनाचे वर्णन, मनाची स्थिती ह्यासंबंधीचे विचार
 मानसशास्त्रात दुसऱ्या पद्धतीने  कसे  वर्णिले आहे हे अतिशय सुदंर, सोप्या भाषेत सांगताना
तिने रसिकांची मने जिंकली.

ह्या व्याख्यानाने  आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये नक्की वागायचं कसं ? हे शिकायला मिळालं.

दोन  पिढ्यांमधील अंतर आता १० - २० वर्षाचे राहिले नाही, त्यामुळे पिढ्यापिढ्यांमधील मतभेद टाळायचे असतील,
स्वतःचे त्रास कमी करायचे असतील..
आणि आनंदी राहायचे असेल तर “ स्वीकारायला शिका”  हा मंत्र त्यांनी दिला.

काही गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणात नसतात तेंव्हा स्वीकारायला  शिका तसेच मार्ग काढण्यासाठी आपल्या
मनाला प्रश्न विचारायला शिकले पाहिजे कारण मन म्हणजे आपले विचार .. आपण जसा विचार करतो तशा  आपल्या भावना येतात आणि आपले वर्तन त्याप्रमाणे होते हे उदाहरणांनी समजावून दिले.


फक्त सकारात्मक विचारपद्धती नाही तर मन स्थिर करायला शिकले पाहिजे.. असे केलं तर आनंदाची अनुभूती अनुभवाल  हे सांगितलं..

सर्व सगळे हेच सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…
फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी… तेंव्हा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण…

खरी मजा पुढे झाली… दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले…  की  ज्या व्याख्यानमालेचे मी आतुरतेने वाट पाहत असते त्या व्याख्यानमालेच्या आयोजनापासून ते ती संपेपर्यंतचा माझा  काळ  हा अतिशय आनंददायी असतो ,
हीच माझी वर्षभराची ऊर्जा असते.....   आणि म्हणून  काही गोष्टी मनासारख्या घडत नसल्या तरी त्या स्वीकारून
वसंत व्याख्यानमालेच्या व्याख्यानांमध्ये रमण्याचा आनंद हा अवर्णीय असतो माझ्यासाठी… हाच विचार मला माझ्या प्रत्येक गोष्टीत करायचा आहे  कारण मला आनंदी राहायचे आहे… आणि आता त्याचा मंत्र ह्यावेळच्या व्याख्यानमालेतून मला मिळाला आहे…

रविवार, २९ मे, २०१६

निळा दिवस (ब्लू डे ) म्हणून जागतिक आॅटिझम दिन साजरा

खास प्रतिनिधी, मुंबई
सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऑटिझम (स्वमग्न/आत्मकेंद्री) या आजाराविषयी माहिती व्हावी व जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने शनिवार दि.२ एप्रिल २०१६ रोजी जागतिक ऑटीझम दिनी फोरम फॉर ऑटिझमया संस्थेतर्फे ऑटिझम मुले व त्यांच्या पालकांनी खुल्या बस मधून एनसीपीए ते पवई फेरी काढली व सामान्य जनतेमध्ये या आजाराविषयी, ऑटिझम काय आहे, तो कसा ओळखावा या बद्दल ची माहिती पत्रकांद्वारे लोकांना करून दिली.
या बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबईतील ताजमहाल हॉटेल,छत्रपती शिवाजी टर्मिनस या महत्वाच्या ऐतिहासिक इमारती निळ्या रंगाने उजळल्या होत्या.
या आजारा विषयीची माहिती एका छोट्या चित्रफिती द्वारे सुमारे १ महिना मुंबईच्या सर्व बसेसमध्ये
दाखवून जन जागृती केली जाणार आहे.
ह्या मुलांना त्वरीत उपचार मिळाल्यास या मुलांना सामान्य जीवन जगण्यास मदत होऊ शकते असे या पत्रकाद्वारे संदेश दिला आहे आणि या संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेची वेबसाईट पाहण्याचे आवाहन या पत्रकाद्वारे केले आहे.
संपर्कासाठी पत्ता : www.forumforautism.org
मदत आणि सहाय्यासाठी फोन नंबर – ०२२-३२९४९५९५
ई मेल – forumforautism@gmail.com
- सीमा कोल्हटकर
पर्यावरण हा आवडीचा वा सवडीचा विषय राहिला नसून गरजेचा विषय झाला आहे... संगीता जोशी.....

 पर्यावरण दक्षता मंच या ठाणे स्थित संस्थेच्या संचालिका संगीता जोशी यांच्या व्याख्यानाला जाण्याचा योग आला. सुमारे १५ वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आज पर्यावरण या विषयात विविधांगी कामे करत आहे.
आजपर्यंत या क्षेत्रात त्यांनी शिक्षण, संशोधन व पर्यावरण जागरूकता करून हा विषय गरजेचा कसा आहे आणि आपल्या जवळचा कसा आहे हे अतिशय सोप्या, रंजक व दैनंदिन उदाहरणावरून समजावून दिले. संस्थेचे एक संचालक श्री. विद्याधर वालावलकर यांनी ठाणे येथे वाह्तुकीवरून होणारे प्रदूषण किती आहे याचा अभ्यास केला आहे व त्याचा अहवाल महानगरपालिकेकडे दिला आहे हे सांगितले.
ही संस्था ठाणे, मीरा-भायंदर येथील सुमारे २५०० रुग्णालयातील बायो मेडीकल कचरा गोळा करून त्याचे व्यवस्थापन करते असे सांगितले. तसेच गेली १२ वर्षे सर्व वयोगटातील लोकांसाठी पर्यावरण शाळेचे आयोजन करते. शाळा म्हणजे पर्यावरण विषयाबाबत साक्षरता निर्माण करते.
शहरी पर्यावरण व ग्रामीण पर्यावरणाचे प्रश्न पूर्णतः; वेगळे आहेत. हे सांगताना त्यांनी   कल्याण मुरबाड रोड वर असलेल्या  मामनोली गावाचा उल्लेख केला. तिथे त्यांनी बिया, वृक्ष तसेच औषधीय वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन करणारे एक संशोधन केंद्र सुरु केले आहे.
तसेच ग्रीन शॉपिंग या माध्यमातून वेगवेगळ्या २५  सामाजिक संस्थां ज्या आज ग्रामीण उद्योगाशी संबंधित
आहेत अशा   उद्योजकांचा माल शहरापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी बांधिलकी निर्माण केली आहे.
हा माल शहरापर्यंत पोचवून वेगवेगळ्या प्रदर्शनातून त्यांची विक्री करण्याचे देखील काम या संस्थेमार्फत केले
जाते. त्यासाठी काही संस्था किंवा व्यक्तींना ह्यात समाविष्ट केले जाते.
कचऱ्याचे व्यवस्थापन
देवनार डम्पिंग ग्राउंड , त्यानंतर हरी ओम नगर यांची कचरा व्यवस्थापनाची क्षमता आता संपली असून भविष्यकाळात कचऱ्याचे व्यवस्थापन हे अत्यंत गंभीर व महत्वाचे ठरणार आहे असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने त्यांनी अनेक प्रयोगानी तयार केलेल्या जादूच्या बादली (magic bucket) चा वापर केला पाहिजे हे सांगितले. ओला कचरा व सुका कचरा याचे व्यवस्थापन आपण कसे करून शकतो हे सांगतानाच ती magic
bucket तयार करण्याचे प्रशिक्षण सुद्धा संस्था देते. ते bucket विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः ते तयार केले तर
त्याचे महत्व व उपयुक्तता अधिक प्रमाणात होईल असे सांगितले.
सदाहरित  जगण्याचे   व्यवस्थापन (Green Living Consultancy) :
ह्या विषयांतर्गत पाण्याचे व्यवस्थापन, घन कचरा व्यवस्थापन, उर्जा स्त्रोतांचे व्यवस्थापन आणि रोपांचे संगोपन व संवर्धन हे सर्व ज्यात येते ते आरोग्याचे व्यवस्थापन याची थोडक्यात माहिती त्यांनी उदाहरणाद्वारे स्पष्ट केली.
जमिनीतील पाण्याचा साठा  ही आपली पाण्याची बँक आहे त्याचे संवर्धन केले तर भविष्यकाळात आपण पाणी समस्येवर तोडगा काढू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्याकडे एक sauce ची बाटली टेस्टिंग साठी आली होती. त्यातील sause काही केल्या विघटन होत नव्हता म्हणजे त्या बाटलीतील sause मध्ये रासायनिक द्रव्याचा वापर केला होता. जाहिरातींद्वारे दाखवण्यात येणारे
sause, jam, junk food यात असणाऱ्या रासायनिक घटकांचा वापर व त्यामुळे होणारी शरीराची हानी त्यांनी विषद केली.
पूर्वी राम मारुती रोड, ठाणे या रस्त्यावर अनेक जांभळाची झाडे होती. पण त्या झाडावर जांभळे येणे बंद झाली. ती का झाली याचा शोध घेतला मधमाश्यांची पोळी नाहीशी झाल्यामुळे झाडाला फळे येण्याचे बंद झाले.
म्हणजेच निसर्गातील प्रत्येक घटक महत्वाचा असतो  याची जाणीव त्यांनी उपस्थिताना करून दिली.
आपण सध्या डास खूप वाढले आहोत असे म्हणतो. पूर्वी डास हे दलदलीच्या ठिकाणी जास्त असायचे. आता आपण शहरीकरणामुळे दलदलीच्या जवळ गेलो आहोत परिणामी आपण डासांच्या परिसरात आहोत असा उलेख त्यांनी केला. डासांना मारण्यासाठी आपण हिट वापरतो त्याचा परिणाम आपल्या श्वसनयंत्रणेवर  पण होत असतो पण हे आपल्या लक्षात येत नाही. असे देखील त्यांनी सांगितले.  अभयारण्यातून काढलेल्या रस्त्यांमुळे होणारे प्राण्याचे अपघात, घुसखोर कोण - ? बिबट्या कि माणूस ? असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सांगतानाच आजोबा हा पर्यावरण विषयक चित्रपट आवर्जून पाहावा असा उल्लेख त्यांनी केला. तसेच त्यांनी
Garbage in Pacific ocean या चित्रपटाचा देखील उल्लेख केला.
पशुंवरील उपचारांसाठी वापरले जाणारे डायक्लोफेनेक हे औषध  वापरले जाते. परंतु  जनावरे जेंव्हा मृत होतात तेंव्हा गिधाडे ह्या मृत जनावरांना खातात. ही गिधाडे जेंव्हा मृत जनावरे खातात, तेंव्हा
त्यांच्यातील महत्वाच्या अवयवात युरीक  acid चे खडे तयार होतात हे युरीक acid बाहेर टाकता न आल्याने हि गिधाडे मारतात. हे औषध विघटक होत नसल्याने गिधाडांच्या शरीरात विष तयार होते. हे सांगतानाच त्यांनी विको नारायणी मध्ये सुद्धा ह्या ह्या औषधाचा वापर होत असल्याचे सांगितले.
कचऱ्याचे व्यवस्थापनाचे कसे करावे ह्याचे मार्गदर्शन आम्ही गृहनिर्माण मंडळांमध्ये जाऊन करतो त्यामध्ये सुद्धा आम्ही तिकडल्या कचरेवाल्यांना सुद्धा ह्याचे प्रशिक्षण देतो असे सांगितले.
हिमाचल प्रदेश हा पूर्णपणे प्लास्टिक मुक्त प्रदेश झाला आहे हे सांगतानाच, श्री. रामदास कोकरे ह्या मुख्याधिकारी यांनी दापोली शहर प्लास्टिक मुक्त केले आहे. हे सांगितले.  प्रत्येकाने स्वतःच्या प्रयत्नातून, लोकशिक्षणातून तसेच ध्यास घेऊन लोकप्रतिनिधीना सहभागी करून जर काम केले तर सर्व काही शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थितांच्या प्रश्नाचे, शंकांचे समाधान त्यांनी केले.
एकंदरीतच अतिशय सोप्या, साध्या व रोजच्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांनी त्यांनी पर्यावरण रक्षण गरजेचे कसे आहे हे सांगून  साक्षर केले.
संस्थेचे नाव : पर्यवरण दक्षता मंच
                    शॉप नं. १५, दादोजी कोंडदेव स्टेडीअम
                   खरतान रोड, ठाणे (पश्चिम )
दूरध्वनी :    ०२२-२५४११६३३


रविवार, २२ मे, २०१६

आरोग्यं धन संपदा.... ... 

ह्या उक्तीची खरी ओळख मला यावर्षीच्या एप्रिल- मे  मध्ये झाली.  वेब जर्नालिझम च्या अभ्यासक्रमाला मी गतवर्षी नोंदणी केली.. 
एकंदरीतच मी तो अभ्यासक्रम खूप एन्जॉय केला. त्या अभ्यासक्रमामुळे 
माझी वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण झाली. 
वेब जर्नालिझमच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दिवसाची गोष्ट .. श्री सुनील घुमे सरानी त्यांची ओळख करून दिली व प्रत्येकास आपण हा अभ्यासक्रम का करत आहात याची माहिती विचारली.   माझे उद्दिष्ट स्पष्ट होते.  मला लहानपणापासून नव नवीन गोष्टी शिकण्याची आवड.. विशेषतः तंत्रज्ञानात होणारे बदल... मी सरांना सांगितले, आवड आणि माझ्या संस्थेला ह्या अभ्यासक्रमाचा कसा फायदा करून देता येईल... तसेच या विषयासंबंधी असणारी उत्सुकता... 
आज अभ्यासक्रम संपताना मला असं जाणवलं  की  माझ्या अभ्यासक्रमाचे सार्थक झालं आहे... गेली ६९ वर्ष जुनी असलेली आमची संस्था या वर्षी झी २४ तास वर झळकली. .. याला कारण माझा अभ्यासक्रम,....
मी whatsappweb चा वापर करू शकले .. 
मी फ्री website तयार करू शकले... 
मी google+, facebook,twitter, ब्लॉग तयार करू शकले...
मी विसरून गेलेली (वेळेअभावी) वाचनसंस्कृती पुनर्जीवित करू शकले.. 
मी तोडक मोडक का होईना काहीतरी लिहू शकले... 
मी अनेक जणींना घेऊन E - मासिक काढू शकले, 
मी पूर्वीची माध्यम व आताची माध्यम यांच्यातील फरक समजू शकले.. 
   (आताच्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर .. जे विकल जात.. तेच पिकवल     जात .. हे अनुभवले. ) 
मी जुन्या गोष्टीना उजाळा देऊ शकले... 
मी अभ्यासक्रमामुळे नव्या तरुणाई बरोबरच जुन्या जाणत्या लोकांकडून माध्यमातील बदलांबद्दल शिकले, 
मी वर्तमानपत्र कसे वाचावे हे शिकले... (पत्रकाराच्या भूमिकेतून) 
मी You - tube channel सुरु कसा करायचा ते शिकले.. 
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या माध्यमाचा पुढील आयुष्यात उदरनिर्वाहासाठी सुद्धा कसा वापर करू शकतो हे शिकले. ... 
आणखी काय हवे ? 
खरतर कोणताही अभ्यासक्रम हा तुम्हाला तोंडओळख करून देत असतो.. बाकी तुमचं  तुम्हीच शिकायचं असतं ... 
ह्याच संकल्पनेतून मी आम्हा मैत्रिणींच सख्यानो.. नावाची website तयार 
केली.  अगदी सरांच्यासारखी नाही केली... पण त्या निमित्ताने माझ्या ५० मैत्रिणी आज e- मासिक कसं वाचायचं.. url लिंक कशी उघडायची हे शिकल्या... त्या आणखी ५० जणांना हे सांगतील... कारण एकट्याने ब्लॉग लिहिण्यापेक्षा अनेकांना घेऊन काम करण्यात मला आनंद वाटतो. 
थोडक्यात मी संगणक  साक्षर होते आता वेब साक्षर झाले.. ह्याचा मला 
जास्त आनंद झाला... 
ह्या अभायासक्रमात मला अनेक सहकारी मिळाले.. विनायक सरांसारखे कवी, सुवर्णा सारखी बुद्धिमान मैत्रीण, प्रीता, स्वाती यांसारख्या तरुणी , प्रत्येकाचा वेगवेगळा स्तर होता तरी आमच्यात एक बंध होते. ते सुद्धा 
मी विसरू शकत नाही. कारण त्यांची उपस्थिती होती म्हणून अभ्यासक्रम 
शिकायला मजा आली.. 
आमचे सर्व मार्गदर्शक प्रशांत जाधव , नरेंद्र बियाणी, हर्षदा परब, रोहित गोळे, यांच्याकडून सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. 

माझी मुलगी मला म्हणाली आई ब्लॉग लिहायच्या आधी ब्लॉग वाचायला  शिक. १ वर्ष अनेक ब्लॉगचा अभ्यास कर.वाचन कर. आणि मग काय ते लिही. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी लेखन केल असलं तरी आता मी खूप वाचन करणार आहे.. विविधांगी ब्लॉग अभ्यासणार आहे.. कारण ती दृष्टी देखील मला ह्या अभ्यासक्रमाने दिली आहे. 

साधारण एक महिन्याचा अंक काढायचा म्हटला तर सलग ५ तास द्यावे लागतात हे सुद्धा शिकले. दरवेळी नवीन अंक काढताना मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळत गेल्या. त्याप्रमाणे मी त्यात सुधारणा करत गेले.  अजून बरच शिकायचं बाकी आहे.. पण हे सर्व शक्य होईल जेंव्हा मी स्वतःची तब्येत सांभाळू शकेन.
 कारण .. मला पूर्ण उमगले आहे की इच्छा कितीही असली, मनात अनेक विचार असले, लिहायचं असलं तरी माझ्याकडून लिखाण राहून जात आहे.. कारण लिहिण्यासाठी असणारी उर्जा, ताकद व शक्ती... काही मी जादूने आणू शकत नाही.. तेंव्हा .. दर महिन्याला अंक नक्कीच काढेन.. त्यासाठी आधी तब्येत सुधारेन...कारण तब्येत ठीक असेल तरच, एकच नाही तर अनेक कामे .. जबाबदारया पार पडू शकेन... 
शेवटी... जाता जाता.. आधी म्हटल्याप्रमाणे अभ्यास, परीक्षा ह्याच्यापेक्षा हा प्रवास मी आनंदाने जगू शकले ... ह्यातच मला वाटत अभ्यासक्रमाच यश आहे. तेंव्हा तात्पुरते ह्या प्रवासातल्या माझ्या सर्व सहकारी मित्र व मैत्रीणीना नमस्कार.  पुनश्च भेटू... नवीन संकल्पनेसह... 

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

बुरख्या आडच्या स्त्रिया



Image result for बुरखा आडच्या स्त्रिया IMAGES

रविवारची संध्याकाळची गोष्ट. ... रस्त्यावरून चालत जात असताना माझ्या समोरच एका पुरुषाने, एका बाईला उचलले व दाणकन स्कूटरवर बसवले...व बडबड सुरू केली. बिचारी “ती” बुरखाधारी महिला लाजेने शरमिंदी झाली... कारण त्याचवेळी मी चालत तिच्याजवळ जाऊन पोचले होते. जोरजोरात खेकसत तो पुरुष ओरडत होता...
गुपचूप सरळ बस स्कूटरवर... त्यावर तिचे बोलणे ... रस्त्यात तमाशा नको...

क्षणात वाटले मध्ये पडावे  पण हिमतच झाली नाही. पण बोच मात्र कायम राहिली...

मनात प्रश्न निर्माण झाले .. बुरख्याआडच्या स्त्रियांचं जग आहे तरी कस ? खरच या स्त्रिया अजूनही मोकळ्या झाल्या आहेत का ? 21 व्या शतकात सुद्धा स्वतंत्र विचारसरणीच्या आहेत का ? आणि असतील तरी प्रत्यक्षात तसे वागू शकतात का ? का विचाराने मुक्त असल्या तरी अभिव्यक्ती – प्रगटीकरणाचे धैर्य अजूनही त्यांचाच नाही तर आम्हा स्त्रियांच्यात आहे का ?

एव्हढे विचार मनात यायला असाच काहीसा प्रसंग आदल्या रात्री ऐकायला मिळाला. ... आणि एकंदरीतच स्त्रियांच्या सद्य स्थितीबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्याच असं झालं, माझ्या मैत्रिणीच्या ऑफिसची सहल ज्याला हल्ली offsite म्हणतात एका रिसॉर्ट वर गेली होती. हल्ली ग्लोबल वर्ल्ड मध्ये offices मध्ये मिश्र संस्कृतीचे, धर्माचे अनेक जण एकत्र काम करताना दिसतात. त्या ग्रुप मध्ये सुद्धा पुरुषांबरोबर महिलाही होत्या. मॅनेजमेंटचे वेगवेगळे खेळ, स्पर्धा याला अगदी उधाण आल होत. अर्थात 4 ग्रुप्स आणि त्यांच्यात स्पर्धा... स्पर्धा आली म्हणजे हार- जीत आलीच... मग जिंकल्याचा जल्लोष...आणि एकंदरीतच उत्साही वातावरण... सर्वजण आनंद लुटत होते... पहिला खेळ झाला आणि कोणीतरी  प्रसिद्ध शांताबाईच...
गाणं लावलं...त्या गाण्यावर बेधुंद होऊन सर्व नाचू लागले. जणू काही वातावरणात रोजच्या जीवनातील असणारा ताण, तणाव, चिंता सगळ्याला मूठमाती दिली होती... काहीजण फोटो काढत होते. आजकाल सहज उपलब्ध असलेल्या मोबाइल मध्ये ध्वानीचित्रीकरण करू लागले. अर्थात हे सर्व होत असताना महिला व पुरुषांनी  वेगवेगळे नाचण्याचे भान ठेवले होते... आणि महिलांमध्ये तरुण अर्थात जास्त होते. ..

खेळ, स्पर्धा झाली... आणि मध्यंतरला एकमेकांना विडियो दाखवणे सुरू होते. तेवढ्यात “ती” भानावर आली.
आणि मैत्रिणीला म्हणाली “ए हा व्हिडीओ देऊ नकोस हं कोणाला – कारण मी नाचले आहे ना त्यात.”

 ह्यात काय अस गैर होत ? असा प्रश्न माझ्या मैत्रिणीला पडला व तिला खरतर धक्काच बसला.  .. खरच ... जे आपल्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न वाटत नाहीत ते इतर समाजाच्या दृष्टीने  इतके महत्वाचे असतात ? पण  हा प्रश्न तिच्यासाठी फार महत्वाचा होता कारण “ती” बुरखाधारी होती. उच्चशिक्षित असलेली व व्यवस्थापक असलेली आपली सखी “ती” अजूनही बंधनात आहे. बुरख्याआड आहे. समाजाच्या दडपणाखाली वावरत आहे..

पण हे फक्त “ती” च्या पुरत मर्यादित आहे का ? तर याच खर उत्तर “नाही” असच आहे. कारण आपण बुरख्याआड नसलो तरी याच
समाजाच्या दडपण असल्या मुळे म्हणा किंवा परंपरांमुळे, संस्कारांमुळे  म्हणा आपण बुरखा पांघरून बसलेल्या महिला आहोत...

फरक  एवढाच कि आपण पहाट पहिली आहे, पण अजूनहि  आपण मुक्तपणे वावरत आहोत का ?इथेही प्रश्नचिन्हच आहे...

आणि याच उत्तर नाही हेच आहे. 

अजूनही अनेक गोष्टींचे निर्णय आपण स्वतंत्रपणे घेत नाही. समाजमनाच्या दबावामुळे म्हणा किंवा आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारामुळे असेल आपण व्यक्त व्हायला घाबरतो, मोकळ्या व्हायला घाबरतो, आणि याच भीतीपोटी काहीजणी व्यक्त होतच नाहीत आणि त्याचीच सवय होत आपले व्यक्तिमत्व घडत जाते.  पण हे व्यक्त होणे, म्हणजेच दबाव, ताण-तणाव ह्यातून मोकळे होण्याची गरज आजही आहे.. हे जेंव्हा सहजतेने घडेल ... तेंव्हाच व त्याला पुरुषवर्गाची सुद्धा साथ असले तेंव्हाच खऱ्या अर्थाने ... स्त्री मोकळी होईल 

खरतरं बुरख्याआडच्या स्त्रियांचा निदान बुरखा दिसतो तरी पण बुरखा पांघरून वावरणाऱ्या स्त्रियांचे दुख कसे कळणार ?

- सीमा कोल्हटकर 



मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

फिर जिंदगी ----जिंदगी भर लक्षात ठेवावा असा चित्रपट ... --- सीमा


फिर जिंदगी.... जिंदगी भर ...लक्षात ठेवावा  असा चित्रपट...
----सीमा
-------------------------------------------------------------------------------------------------------------
कलाकार - नसरुद्दिन शहा, रत्ना पाठक शहा, नीरज कबी, अमृता सुभाष, विक्रम गोखले, ज्योती सुभाष, उत्तरा                 बावकर ,संदेश कुलकर्णी
कालावधी - फक्त ५५  मि.

प्राज फौंडेशन च्या सहकार्याने , ZTCC पुणे  यांनी प्रदर्शित केलेला
म्हणजे जिंदगी भरच नाही तर जिंदगी के द बाभी ... इतरांनी लक्षात ठेवावा असा हा फक्त ५५ मिनटांचा हा
चित्रपट......

या माहितीपटाची मूळ लेखन , कथा व चित्रपट संवाद सुमित्रा भावे या दिग्गज लेखिकेचे आहेत. तसेच दिग्दर्शन व त्याचे संकलन  सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांचे आहे.
कलाकार, चित्रपट कथा, आणि एकूणच तांत्रिक दृष्ट्या हा माहितीपट पहिल्यापासून मनाची पकड घेणारा आहे.
     रत्ना पाठक शहा  व नसरुद्दिन शहा, विक्रम गोखले, अमृता सुभाष  ज्योती सुभाष  यांसारख्या दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
उत्कृष्ट कथा, चित्रपट संवाद, संकलन, सामाजिक आशय असलेला व  तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा हा चित्रपट
बघण्यासाठी वेळ जरूर काढा.
अवयव दानाबद्दल असलेले समज , गैरसमज दूर करण्यात आणि समाजप्रबोधन करण्यात हा चित्रपट
शत प्रतिशत यशस्वी झाला आहे खरा  पण हा चित्रपट बघून अवयव दान करायला  समाजातील अनेक
जण पुढे येतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने या चित्रपटाचे  यश असेल...
शेवटी जाता जाता  आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते  विंदा करंदीकर यांची कविता हा चित्रपट  पाहताना मला आठवली.
देणाऱ्याने घेत जावे , घेणाऱ्याने  घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे....

अत्यंत सुंदर चित्रपट... अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. ...
(खाली दिलेल्या PHIR ZINDAGI ) या शब्दावर mouse चे बटन नेऊन click करा की लिंक येईल त्यावर click करा, लगेच चित्रपट चालू होईल. )

PHIR ZINDAGI






तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...